सेवानिवृत्तीचा काळ

काळ झपाट्याने पुढे जातो…तुमचा सेवानिवृत्तीचा काळ त्याच झपाट्याने जवळ येत असतो आणि ते वर्ष..तो दिवस आणि तो क्षण येऊन ठेपतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे सेवानिवृत्त होता.

होय, मी त्याच पंधरा-एक वर्षाबद्दल बोलतोय ज्या उंबरठ्यावर तुम्ही असता…मागे वळून बघता आणि पुढेही नजर टाकता…त्या अटळ अशा क्षणाबद्दल कल्पना करतांना..

हीच ती पंधरा वर्षे ज्यात तुमची वृत्ती निवळते…सहनशीलता वाढायला लागते… स्वभाव सर्वसमावेशक बनायला सुरुवात होते…राग कमी कमी होत जातो आणि कणव…माया…सहानुभूती ह्यात हळू हळू वाढ होत असते.

हे ठीकच आहे…कदाचित असे होणे योग्यच असावे आणि तुम्ही तुम्हाला एकटे असतांना शाबासकीही देत असता…जोपर्यंत तुमची लाडकी कन्या, जी आता मोठी झालेली असते आणि तिच्या संसारात मग्न असते, म्हणू लागते..

“बाबा, मला तुम्ही माझ्या बालपणी आणि वाढत्या वयात जसे होता तसेच हवे आहात…हे मऊ मऊ वागणे मला कसेतरीच वाटते…पूर्वी सारखे रागवा पाहू कोणावर…बसवा पाहू ती जरब आणि ती आदरयुक्त भीती…मला तुम्ही तसेच हवे आहात…….”

आणि मग तुम्ही विचार करू लागता…कुठची प्रतिमा तुमची योग्य..? कन्या म्हणते ती की आज झाला आहात ती…?

मित्रांनो आहे उत्तर तुमच्यापाशी…?

मधुसूदन थत्ते
०६-०३-2016

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *