वृद्ध पिंपळाचे मनोगत

खूप खूप….खूप वर्षे झाली…

फर्ग्युसन कॉलेजचा विस्तृत परिसर….अनेक वृक्ष,,अनेक वेली…अनेक फुले अनेक पक्षी..

असाच एक पिंपळ होता..आज खूपच म्हातारा होता..

आज तो वृद्ध पिंपळ सळसळतोय..
मनात जरासा हळहळतोय..

म्हणतोय….
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

किती दशके मागे गेली…!!! मालिनी रोज यायची…बाकावर बसायची…गुणगुणायची…

“कधीतरी कुठेतरी फिरून भेटशील का..
अनोळखी मुशाफिरा वळून पाहशील का…?”

श्रावणात भिजायची…प्रियकराची वाट पहायची…

असाच एक श्रावण होता…उन-पावसाचा खेळ होता…बेधुंद असा तो काळ होता…सळसळ पानांचा नाद होता..

वार्धक्याने निखळले, अलगद गळले…. एक माझे पान…

भिरभिरले पण भरकटले नाही…

त्याला मालिनीच्या हातात पडायचे होते…

मालिनीचा प्रियकर आलाच नाही…मी तो कधी पाहिलाच नाही..

श्रावण सरला…वर्ष सरले..
वर्षामागून वर्षे सरली
◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘◘

असाच एक श्रावण आला..
अशीच एक वृद्धा आली..

बाक अजून तसाच होता..
वृद्धा त्यावर विसावली होती..

वार्धक्याने निखळले, अलगद गळले आजही एक माझे पान
भिरभिरले पण भरकटले नाही…

त्याला त्या वृद्धेच्या हातात पडायचे होते…

पडले..

वृद्धेने वर पाहिले…

बोलली का ती माझ्याशी..? हो…सांगायचे होते तिला काही…

तिने तिच्या हातातल्या एका खूप जुन्या चुरगळलेल्या वहीतले एक पिंपळ पान काढले

जाळीदार पिंपळ पान …

ठेवले ते माझ्या पायाशी..

उचलले आज पडलेले भिरभिरते पान..

अन वृद्धा निघून गेली..

तिने ठेवलेले जाळीदार पिंपळ पान वा-याने दूर दूर भिरकावून दिले..

मी म्हणालो…अरेरे…ती मालिनी होती का?

मी सळसळलो….मी हळहळलो

पण आता काय उपयोग…?

आज पडलेल्या पानाला जाळी केव्हा पडणार…???.

मधुसूदन थत्ते
०५-०६-२०१६
माझा स्वैर कल्पना विलास

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *