वळणावरुनी वळली गाडी..आज सोडलं गांव …

TV वर एक सुंदर भावगीत लागलं अन, स्नेहल कन्येला अचानक म्हणाली..

“सेमल..please मोठं कर..मला नीट ऐकायचय हे गीत..”

सेमल पहात होती…आई अतिशय तल्लीन होऊन हे गाणे ऐकते आहे…

गीत संपले…आईने डोळ्यातला अश्रू हळूच पुसलेला सेमलने पाहिला..पण लगेच प्रतिक्रिया देण्याचा तिचा स्वभाव नव्हता…मनात ठेवले तिने..दोन्ही…ते गीत आणि तो अश्रूही..

तीन चार दिवसांनी सेमलने कॉलेजच्या मैत्रिणींना सहज हे सांगितले…

“अगं..ह्या गीताची ध्वनिमुद्रिका आहे आमच्याकडे…बाबा आणि आई ऐकतात ही जुनी गाणी कधी कधी..” मैत्रीण कुसुम म्हणाली..

झालं..मोबाइल वर कॉपी करायला कितीसा वेळ…!!!

संध्याकाळी आई एकटीच गच्चीवर पाहून सेमल हळूच तिच्या मागे गेली आणि हलके तिने ते गाणे सुरु केले…

अगं.आई शिवरंजनी रागातले हे गाणे इतके करुण आहे की तुझ्याच काय…माझ्याही डोळ्यांना आज पाणी आले..
गाणे चालू होते…

“तुझ्याच आई अश्रूसंगे, पुसले पहिले नांव…वळणावरुनी वळली गाडी..आज सोडलं गांव …”

स्नेहल-सेमल मायलेकी एकमेकींकडे साश्रू नयनांनी बघत होत्या..

“पण आई, त्या दिवशी तू हे ब-याच दिवसांनी ऐकलेस का भावगीत?…कारण अशी भाववश मी तुला पहिल्यांदा पाहिले”..सेमल

“खूप खूप वर्षे झाली सेमल त्याला…” आई सांगू लागली…
….
मी लहान होते सहा वर्षाची. आम्ही सागर किना-यावर नेहेमी जात असू..जवळच होता..वाळूत खूप खेळायचो..

एकदा, माझ्या कानावर ह्याच गाण्याचे मंजुळ स्वर आले..एक म्हातारा माणूस ते वाजवत होता…ते वाद्य सारंगी होते हे मला नंतर कळले..

इतके सुरेल असे ते सूर…मला त्या लहान वयातही खूप भावले..तो शिवरंजनी हा अत्यंत करुण राग होता हेही मला खूप वर्षांनंतर समजले…

मी गेले त्या म्हाता-याजवळ..

त्याचा कातर आवाज मनाला भिडला…तो जणू बरळत होता…त्याचे डोळे दूर समुद्रावर लागले होते
म्हणाला

“ये ताई आलीस…किती वाट पाहिली मी तुझी. मला माहित होतं ह्या वाळूत तू पुन: माझ्याशी खेळायला येशील नक्की…

तुझ्या लग्नात हे गीत लागले होते…आपल्याला आई नव्हती..म्हणून माझ्या…तुझ्या धाकट्या भावाच्या अश्रूंनी तू पहिले नांव पुसलेस आणि वळणावरून वळलेल्या गाडीने सासरी गेलीस…
मग काही महिन्यांनी विलायतेला गेलीस…ती आलीच नाहीस..

बघ आता आलीस ना…”

इतके म्हणून त्या म्हाता-याने माझ्या रोखाने पाहिले..हात पुढे केला…पण मी खूप घाबरले आणि पळाले तिथून..

काही दिवसांनी कळले की त्याच रात्री तो म्हातारा ह्या जगातून निघून गेला होता…

मला खूप वाईट वाटले…

माझ्या लग्नात मला “गाणे म्हण असे जेव्हा कुणी सांगितले तेव्हा हेच गाणे मी म्हटले होते…

सेमल डोळे विस्फारून हे ऐकत होती…मग म्हणाली…

“आई माझ्याही लग्नात तू हेच गाणे म्हणशील…मी नाही रडणार…आणि तू पण रडायचे नाहीस”

स्नेहल उत्तरली..

“नाही गं बेटा…आम्ही तुझं नांवच बदलू देणार नाही…मग ते पुसायचा प्रश्नच मिटला..”

माय-लेकी मनापासून हसल्या ख-या
पण
साश्रू नयनांनी..

मधुसूदन थत्ते
०५-०४-२०१४
(संपूर्ण स्वतंत्र कथा)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *