मी फिरायला गेलो होतो

आज जाग आली तो घड्याळात ५ वाजलेले दिसले पहाटेचे ..
फिरायला जायचे जरा लवकरच होत होते पण निघालो…अंधार चांगलाच होता..
कॉलोनीच्या मैदानात चालायला चक्राकार मार्ग आहे…मनात आले अंधार आहे रस्त्यावर, आज मैदानातच चकरा मारू…
सुरु केले नसेल चालायला तो पाठीत अशी काही लचक भरली की तिथेच बाकावर बसलो…
दुरून त्याच चक्राकार वाटेवर कोणीतरी माझ्यासारखेच लवकर आलेले दिसले…गोल फिरून माझ्या बाकापाशी तो आल्यावर मी ओळखले…हा गोपाळ…मी त्याला हात केला पण त्याने ओळखले नसावे मला कारण गोपाळ गेली पाच वर्षे पुण्यात नव्हताच…
मी पुन: उठलो पण पाठ दुखायला लागली म्हणून फिरणे रद्द करून घरी जायला निघालो..
इतक्यात गोपाळची स्वारी राउंड करून पुन: मला निसटती अशी गेली…वेगात होता तो त्या फिरण्याच्या…
तसे उकडत होते पण गोपाळ जवळून गेल्याचा वारा लागला आणि थंड वाटले..
घरी परतलो..दारात एक काळी मांजर आडवी गेली…अस्सा राग आला मला..
पत्नी जागी झालेली दिसली..
“कुठे गेला होतात ह्या मध्यरात्री..?”..पत्नी..
“मध्यरात्र…? घड्याळात पाच वाजले होते मी निघालो तेव्हा…आता साडेपाच असतील..”..मी मग मी घड्याळाकडे पाहिले…अजून त्याच्यात पाचच वाजलेले होते..
“अरेच्या…बंद आहे हो,,,!!!”…मी “मग..? आता कुठे साडेबारा वाजले आहेत…”..पत्नी…
बापरे..म्हणजे घड्याळाने मला चांगलेच ठकवले..
“मला गोपाळ दिसला…तो ही ह्या वेळी कसा मग फिरायला आला..” ..मी..
“कोण..? गोपाळ पोंक्षे..?…अहो असे काय करता…तो पाच वर्षापूर्वी वारला नाही का अपघातात…?
माझ्या मनात चक्राकार फिरणारा, आत्ताच पाहिलेला गोपाळ न येता तो जवळून गेल्यावरचा गार वारा मात्र आला…आणि…….आणि…ती काळी मांजर…!!!
मधुसूदन थत्ते
२७-०५-२०१६
(माझी संपूर्ण स्वतंत्र काल्पनिक कथा…आत्ताच लिहून पूर्ण केली.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *