माझा पारिजात…

केव्हा लावला…? १९७३ साली…

कोणी लावला…? माझ्या आईने..

रोज माझ्याशी बोलतो. म्हणतो…..

“माझीही चाळीशी उलटली…किती पावसाळे पाहिले मी…!!!
देव मला सांगत असतो…..

आपले म्हणून जे फुलवतोस ते भरभरून देत जा सर्वांना..तुला नाही कमी पडणार…

मग देतो मी सर्वांना…खूप खूप देतो…सहाही ऋतूत देत रहातो…इकडे देतो…तिकडे देतो…वारा येऊन दूर उधळतो माझे दान..

द्वापार युगातला पारिजात म्हणे पलिकडे…शेजारी… फुले पाडायचा …पण मी नाही तसा…”

मी म्हटले…

आज माझ्या मस्तकी नाही ठेवलेस एखादे फूल…? रोज तर मिळते मला तसे…”

म्हणाला…”वा-याला विचार…”

वाटले..हा माझा इथला सर्वात जुना मित्र…जरा हाताने गोंजारू दे त्याला…

पण जवळ कसा जाऊ…खाली मातीत फुलांची चादरच जणू त्याने पसरून ठेवल्ये..

त्याने ओळखले…म्हणाला…”तुझ्याच साठी आहे तो सडा….खुशाल चाल त्यावर..

आणि…

मघापासून ज्याची अपेक्षा करत होतो ते एक सुंदर भिरभिरते फूल पडलेच माझ्या माथ्यावर..

मी हसलो…पारिजाताकडे वर पाहिले..

म्हणत होता..

“अतिथी देवो भव…..”

मधुसूदन थत्ते
०१-०६-२०१६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *