मन माझे सरिता जलसे

ती एक १९६० ची शाम होती. रामकृष्ण-विवेकानंदांच्या बेलूर मठ परिसरात हुगळी नदीच्या काठी एका निवांत जागी मी सूर्यास्ताचा देखणा पट पहात होतो..

इतक्यात माझे लक्ष एका व्यक्तीकडे गेले…माझ्याचप्रमाणे ते निवांत बसले होते आणि हुगळीच्या संथ प्रवाहाक

डे नजर लावून होते.

मी निरखून पाहिले. माझा विश्वासच बसेना..हे तर भानुप्रसाद त्रिवेदी..!! एक प्रथितयश साहित्यिक. आझे आवडते लेखक.

मी जवळ गेलो. ओळख करून घेतली. एवढा मोठा माणूस पण हाताने वाळू थोडी साफ करून मला म्हणाले, बस इथे जरा. बघ ह्या गंगेकडे…

जरा दोन चार गप्पा झाल्यावर मी त्याना विचारले..

“भानुजी, तुम्हाला एवढे सुंदर कसे लिहिता येते…” माझा प्रश्न म्हणजे ज्योतीला विचारणे…तुझे तेज कशात ग?

भानुजी हसून म्हणाले…”अरे ती तर मी चोरी करतो…”

मी बुचकळ्यात पडलो..वांग्मय चोरी आणि भानुजी…केवळ अशक्य…

पण त्यांनी माझा संभ्रम जाणला…म्हणाले..

“गंगेच्या किना-यावरची झाडी तुला पाण्यात दिसत्ये का?”

“हो, ते तर प्रतिबिंब आहे त्यांचे”..मी

“ते तुला दिसते कारण आत्ता पाण्याचा पृष्ठभाग शांत आहे होय ना?”

“हो,,हे तर उघडाच आहे”..मी

“मग हाच विचार जरा व्यापक कर.

असं पहा मी आत्ता इथे शांत बसलो आहे. आज दिवसभरात अनेकविध घटना घडल्या, वेगवेगळे विचार मनात आले, अनुभव मिळाले…

त्या सा-यांचे प्रतिबिंब तर माझ्या मनात उमटले..पण मनाचा पृष्ठभाग स्थब्ध-शांत हा आत्ता इथे निवांत संध्याकाळी झाल्यावर मिळाला.

मग एकेक घटना, बातचीत, अनुभव अशांची प्रतिबिंब मनात स्पष्ट झाली. अशी ती पाहून मग मला शब्द सुचतात…म्हणजे त्या सा-या घटना, बातचीत, अनुभव ह्यांची मी सुरेख शब्दात फक्त मांडणी केली…ते सारे माझे असे नव्हते की नाही…म्हणून ती चोरी…”

आणि भानुजी एखाद्या निर्मळ झ-याप्रमाणे खळाळून हसले.

“पण मग वाईट घटना, विचार, अनुभव ह्याने मनोमालिन्य तर येत असणारच ना…मग मनाचा पृष्ठभाग शांत कसा ठेवावा?” मी बाळबोध प्रश्न टाकला.

“त्याचेही उत्तर गंगेत आहे. आपले जीवन हा एक काल-प्रवाह आहे नाही का? आणि गंगेचा आहे हा जल-प्रवाह. वाहता वाहता गंगा गावागावाला स्पर्शून जाते. त्या गावांची नाली-गटारे-गाळ तिच्यात येऊन मिळतात. गंगा आपली पुढे पुढे जाते. सारा गाळ तळाशी ठेवते. निर्मळ जल वर ठेवते. गाळ जलचर खाऊन टाकतात..काही पुढे सरकत सरकत सागरात जातो…”

“लक्षात आला माझ्या भानुजी..” मी त्याना मधेच थांबवले. तुम्ही पण वैचारिक गाळ मनात खोल दडवून ठेवता…कालांतराने तो विसरून जाता.”

भानुजी नुसते हसले…म्हणाले..”एवढेच नाही…”माझ्या मनातले जलचर सुद्धा कधी कधी उसळी मारून वर येतात आणि पृष्ठभाग हेलाकावून सोडतात…पण मी त्याना लगेच शमवतो..खाली ढकलून देतो…समजले ना…”

“हो, भानुजी आज मला एक नवी दृष्टी मिळाली…आणि आजच्या ह्या एकूण संभाषणाची पण नंतर केव्हातरी तुम्ही “चोरी” करणार का”…मी खट्याळपणे विचारले..

“नाही, मुला…ती चोरी आता तू कर…आणि बघू काय लिहितोस ते…दाखव मला…” …भानुजी..

मी घरी आलो आणि हे जे लिहिले आहे ते त्याचाच परिणाम आहे, मित्रानो. बावन वर्षांपूर्वीचे आहे हे माझे लिखाण.

(एक कल्पनाविलास)

मधुसूदन थत्ते

२१-१०-२०१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *