जय देवा, गणेशा.

आज कार servicing करून मिळाली…पद्मजाला म्हटले चल पेट्रोल भरून येऊ…ते झाले अन मी गाडी एका रस्त्याला वळवली…जरा पुढे गेल्यावर..

“तुम्हाला कसं माझे मन समजले..?”……इति पद्मजा

“म्हणजे?”…मी..

“माझ्या मनात होतं आज अंगारकी चतुर्थी म्हणून दशभुजा गणपतीचे दर्शन घ्यावे…हा रस्ता तिथेच जातो..मला माहित आहे…. “ …पद्मजा…

ह्या गणेशाचे दर्शन प्रथम आम्हाला १९७२ च्या पावसाळ्यात झाले…अगदी लहान असे हे देऊळ होते तेव्हा…आजुबाजूला सारी शेतजमीन….इथे चिखल तुडवीतच आलो तेव्हा….

तेव्हाची मूर्ती आजचीच असावी पण तेव्हा पूर्ण शेंदरी रंग होता आणि गाभारा असा भाग वेगळा नव्हता…मूर्तीच्या पायाशी जाता यायचे…गणेशच्या सुंदर डोळ्यात पहावे…प्रसन्नतेचा अनुभव घ्यावा…तेव्हाच मी पाहिले होते की हा विनायक उजव्या सोंडेचा आहे…

आज भव्य मंदिर झाले आहे त्या देवळाचे….लांबूनच देव दर्शन घेता येते…मूर्ती सुवर्णरुपात आज दिसते..आज देवाचे सुंदर डोळे मात्र पूर्वीसारखे भक्तीने न्याहाळता येत नाहीत…मुर्तीवरच्या वस्त्रालंकारामुळे मुळे आज सोंडेची दिशा नीट उमगत नाही…

“हा गणपती उजव्या सोंडेचा आहे”…मी म्हटले..

“मला तर तो डाव्या सोंडेचा वाटतो आहे..”…पद्मजा

हा संभ्रम त्या दुरून केलेल्या दर्शनाने निर्माण झाला होता….

मी गाभा-यातल्या प्रसाद देणा-या काकुंना विचारले आणि पद्माजाला उत्तर मिळाले…”हो उजव्या सोंडेचाच आहे गणेश..”

अनेक भाविकांचा हा आराध्यदेव….मूळ मूर्ती कुणाला तरी दिसली…देऊळ झाले…त्याचे भव्य मंदिर झाले…पिढ्या न पिढ्या त्याच्या चरणी नतमस्तक झाल्या…येणा-या अनेक पिढ्या ह्या देवाचे दर्शन घेणार आहेत…

अगदी छोटेसे देऊळ असतानापासून इथे सरस्वती कायम निवास करून आहे……

हळू हळू लक्ष्मी येत राहिली…तिचे आगमन आज इथे दिसणा-या श्रीमंतीवरून लक्षात यावे…

मी मात्र मनातल्या त्या छोट्या देवळाला शोधत असतो…म्हणत असतो…देवा तू तिथेच आनंदी होतास का रे?

माझा प्रश्न ऐकून ती उजवी सोंड किंचित हलल्यासारखी मला भासली…आणि त्या मागचे गणेशाचे स्मित जाणवले.

मधुसूदन थत्ते
०९-१२-२०१४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *