एक मनोगत.

मित्रांनो. स्वाती (Swati Godbole) MA करत होती…psycology तिचा विषय…तिने हे मनोगत तेव्हा लिहिलेले आज मला सापडले…

“धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना…”

स्वाती पण तेव्हा एक कळीच होती ना…!!
============================
धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना
शब्दरूप आले मुक्या भावनांना…

किती सुरेख कल्पना आहे ही. ह्या भावना आपोआप उमलत असतात. उमलत्या कळीचे मन तर विचारायलाच नको.

मनाची चंचलता ह्याच वयात जास्त अनुभवास येते. क्षणात मनात एक विचार येतो ना येतो तोच दुसरा विचार पाठोपाठ घुसतोच.

एकीकडे मन गुंतलं की काहीही करा पण कधी कधी स्वप्नातच रममाण झाल्याप्रमाणे वाटतं.

खरंच की , आता ह्या कळीला भंव-याची गरज असते. उगीच नाही ती उमलत असताना मंद सुवास पसरवत !

प्रत्येक कळीला मनातून अगदी असेच वाटत असेल का..?

एखादं गाणं ऐकतानाही आपल्या प्रिय व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर असते. एवढं झपाटून गेल्यासारखं नक्की असतं तरी काय? ते मात्र कळत नाही. पण प्रत्येक व्यक्तीसाठी असा एखादा तरी क्षण येत असतोच. मग तो क्षण अगदी घट्ट पकडून ठेवावासा वाटत असतो. खूप जपावा असं वाटत असतं. पण ते कधीतरी कोणाला शक्य आहे का?

व्हायचं तेच होतं आणि तेच सुगंधी क्षण वेचण्यासाठी प्रत्येक कळीचा जीव उतावीळ होत असतो.

मनातली प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे कुणीच व्यक्त करत नाही, पण हावभावावरून, कृतीवरून मनात काय आहे ह्याचं स्पष्ट चित्र उभं रहातं. जीवाची घालमेल, चंचलपणा नकळत सारं काही सांगून जातो. लपवायचा असतं तेही…!!!

प्राण्यांना पण मन असतं का? असेलही एखाद वेळी.

माणसाच्या मनाचं वर्णन बहिणाबाईंनी किती सुंदर स्वरूपात केलं आहे..!!

मन वढाय वढाय….
उभ्या पिकात ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर

खरोखर ह्याची प्रचीती क्षणोक्षणी येत असते. अचानक आपली तंद्री लागते. आपण भोवताली काय चालले आहे हे क्षणभर विसरतो. आपल्याच गोड आठवणीत रमतो.

मन हे खरंच खूप चपळ आणि चंचल आहे.

स्वाती गोडबोले
१९८८-१९८९ साली केव्हातरी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *