अनोळखी मुशाफिरा…वळून पाहशील का?

मी…मंगेश गोडबोले…

मी मूळचा वाईचा नाही पण प्रथम वयाच्या सोळाव्या वर्षी वाईला आठ दिवस जे राहिलो तेव्हा पासून कृष्णेचे काही विलक्षण आकर्षण आणि नाते माझ्याशी जे जोडले गेले ते जन्म-जन्मांतरीचे..

आज वयाची साठी आली तरी दर दोन-तीन वर्षा आड जमेल तसे मी कृष्णाकाठी जाऊन येतो.

मला तशी गायनाची खूप आवड. गदिमांचे संथ वाहते कृष्णामाई प्रथम ऐकले ते मनात इथे घेऊन आलो..माईला म्हणून दाखवले..तीच माझी वाईची पहिली भेट.

मी गात असताना विमल फिदीफिदी हसत होती. मला नाही ते आवडले..एक पूर्ण दिवस तिच्याशी मी अबोला धरला..मग आली..”ए, ये ना रे..चल पुन: जायचे का काठावर?”

विमल…विमल जोशी… मी रहायचो त्या माझ्या मामांच्या वाड्याच्या समोरच होतं तिचं घर. घरोबा होता दोन घरांचा. त्या आठ दिवसात खूपदा आली…आम्ही फिरायला जात असू..दोघेच… तेवढ्यात तिने माझे नामकरणही केले..”मंग्या-मंगचट”.

एकदा मामी, मी, विमल आणि तिची आई असे एका मराठी सिनेमाला गेलो होतो. विमल माझ्या शेजारी बसलेली मला आवडली नव्हती..कोणी काय म्हणेल..!! ती तेराची आणि मी सोळाचा..मला मुली आवडत नसत..आणि ही किती वेळा कोपरांनी मला टोकत होती..जरा काही झालं त्या कथेत की…!!

आठ दिवस कसे गेले समजले नाही. “बराय..येतो हो ..असे विमलच्या आईला मी म्हटले तेव्हा विमलच्या डोळ्यातून एक अश्रू चमकलेला मी पाहिला…मनात म्हटले किती भाबडी पोरगी आहे ही.
त्या अश्रूत ओढ होती…आणि असहाय्यतेचे दु:ख होते..जे मला तेव्हा दिसले नव्हते…

नंतरची तीन वर्षे माझे वाईला जाणे झाले नाही. पण जेव्हा गेलो तेव्हा विमल नव्हती. मी नाही कुणाला विचारलं बिचारलं..मामी आपण होऊन म्हणाली.”तिला शिकायला पुण्याला ठेवले आहे….”

काळ कुणासाठी थांबला आहे? आज पंचेचाळीस वर्षांनी कित्येक स्थित्यंतरं झाली आहेत..जग बदललय, मी बदललोय, मामा-मामी केव्हाच निवर्तले होते…वाईला दर दोन-तीन वर्षांनी जाण्याचा माझा नियम कधी पाळला, कधी नाही…

खूप खूप पाणी कृष्णेने वाहून नेले…खूप खूप सहन केले तिने आणि वाईनेही.. नीतिमत्ता तिच्या पाण्यात बुडवलेली तिने पाहिली. आताशा सूर्याला अर्घ्य मिळेनासे झाले.

ह्या खेपेस मी वाईला येऊन एकच दिवस झाला होता. माधव…माझा मुलगा…ह्यावेळी माझ्यासोबत होता….नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते त्याचे. आम्ही मामाच्याच वाड्यात उतरलो होतो…माझा मामेभाऊ वाईचा नगराध्यक्ष होता आता…मोठा मान होता त्याला.

मी आणि माधव आलो होतो तीन दिवसासाठी पण माधवला, माझ्याच प्रमाणे कृष्णाकाठ खूप प्यारा झालेला दिसला…

“बाबा, अजून एक दिवस राहू…पुन: मी एकटाच कृष्णेवर शांत बसून येईन..आपण परवा निघू…चालेल?”

खरे मलाही अजून राहायचे होते…
————————————————————————–

आम्ही पुण्याला परत येऊन दोन-तीन महिने होऊन गेले. माधवला छान अशी नोकरी मिळाली होती, स्वारी खूष असायची…आईशी जरा जास्तच त्याची दोस्ती…दोघांचे काय गुलु गुलु चालायचे झोपाळ्यावर बसून देव जाणे.

असेच एक दिवस त्यांचे “गुलु गुलु” जरा लवकर उरकले आणि मी आत पेटीवर भजन म्हणत होतो तिथे दोघेही आले…

अरेच्च्या काहीतरी भानगड आहे बहुतेक… मी ताडले.

“अहो, माधवला तुम्हाला काही सांगायचय…”..पत्नी वसुधा म्हणाली.
“OK ..काय रे बेटा…”..मी

“बाबा, मी एक मुलगी पसंत केली आहे”…माधव..
“अरे वा…म्हणजे आम्ही अजून सुरुवातही केली नाही अन तू तर मजल गाठलीस…सांग तरी ह्या तुझ्या खास मैत्रीणीबद्द्ल… ” मी.

सुनीता पाटणकर हे तिचे नाव. सुशिक्षित, सुसंस्कृत घरातली..आई-वडील पुण्यातच..इत्यादी माहिती बरी वाटली.

“अरे, पण तुला कुठे भेटली?”…मी

“मध्ये आपण वाईला गेलो होते ना…तिथे..”

“ओहो..आत्ता लक्षात आलं तुला तिथे एक दिवस जास्त का राहायचं होतं ते…!!!” मी

“तसं नाही हो…ती मामांच्या वाड्यासमोर ते जोशी रहातात ना, त्यांच्याकडे आली होती. त्या जोशी आजोबांची ती नात आहे..”..माधव…

नंतरचा तपशील देत नाही…ते अशा प्रसंगी जसे होते अगदी तसेच आमच्या घरी झाले…आणि साखरपुड्याची तारीख ठरली.

छोटासा घरगुती कार्यक्रम आमच्याच घरी झाला. सुनीता गोड दिसत होती. खेळकर होते सारे पाटणकर मंडळ..मुख्य म्हणजे गाण्याची आवड असलेले…माझ्या दृष्टीने ह्याला शंभर मार्क.

तीन तास मजेत गेले. साखरपुडा छान पार पडला.

नंतरचे दोन-तीन महिने आमचा सा-यांचा परिचय खूप वाढला, येणे-जाणे झाले ..गाण्याचे कार्यक्रम झाले…

एके दिवशी सुनीता संध्याकाळची आली तोच माधवचा फोन आला…त्याला दोन तास उशीर होणार म्हणून. वसुधा कुठे बाहेर गेली होती.

“काका, एक विचारू?”…सुनीता..

“काय ग बेटा..विचार ना…” मी

“काका, तुमचे ते गाणे..’कधीतरी, कुठेतरी, फिरून भेटशील का’ मला खूप आवडले..मला त्याचे रेकोर्डिंग टेप करून हवंय…कुठे मिळेल ते गाणे?”..सुनिता

“अगं ते एका जुन्या सिनेमातले आहे..’गळ्याची शपथ’ ह्या. आता कुठे असे इतके जुने गाणे मिळणार? हवे तर मी म्हणतो आणि घे तू रेकोर्ड करून माझे मोडके तोडके गाणे…” मी
“असं नाही हो काका, तुम्ही छानच म्हणता…” तो संवाद तिथेच संपला.

सुनीताच्या बाबांची फिरतीची नोकरी होती. नुकतेच ते परदेश दो-यावर गेले होते. माधव-सुनीता विवाह अजून सहा महिन्यांनी करायचा हे ठरले होते. सुनीताचं येणं जाणं अगदी घरच्यासारखं झालं होतं…माझ्याशी, वसुधाशी अगदी मनमोकळ्या गपा करायची ती. असेच एकदा वसुधाला तिच्या माहेरी एका कार्याला आठ दिवस जायचे होते त्या काळातली गोष्ट…

“काका, ते गाणे, जे मला हवंय, ते तुम्ही केव्हा ऐकलत प्रथम?….” सुनीता

मला हे कळेना ह्या गाण्याचा ह्या पोरीने एवढा का ध्यास घेतला आहे…मग अगदी सारा तपशील तिला सांगितला…तो सिनेमा कोणी कोणी आम्ही पाहिला, मग हे गाणे कसे ओठावर कायम राहिले..मग त्यात मामी आली, विमलची आई आली, विमल आली…अगदी, मी पुण्याला परतताना विमलच्या डोळ्यातला अश्रूही आला…

“काका, किती भाबडी असावी ना ही विमल..” सुनिता…

दुस-या दिवशी माधव-सुनीता संध्याकाळी फिरून आले आणि सुनीता म्हणाली,

“काका, उद्या माझ्या आईचा वाढदिवस आहे…आम्ही दोघांनी ठरवलय हॉटेल प्राईड मध्ये साजरा करायचा…तुम्ही तिथे पोहोचा…मी आणि माधव आईला घेऊन येतो…”

माझ्या हो-नाही ला महत्वच नव्हते..कार्यक्रम ठरला होता..

मी हॉटेल मधे पोहोचलो तेव्हा, खास अशा एका स्वतंत्र आणि सुशोभित जागी ही तिघेही जमली होती…

“नमस्कार, सुनीताच्या आई…जीवेत शरद: शतम…” मी

“अहो पहा ना हिने फारच आग्रह केला…हे काय आता वय आहे का वाढदिवस असे साजरे करायला…” आई

जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या..इतक्यात सुनीताने वेटरला काही खूण केली…आणि…
मला आश्चर्याचा धक्काच बसला…ते गाणे सुनीताने कुठून तरी टेप करून मिळवले होते आणि त्या मंद प्रकाशात, त्या सजावटीच्या शांततेत लता मंगेशकरांच्या आवाजातले ते गाणे मी ऐकत होतो…

“कधी तरी, कुठे तरी फिरून भेटशील का?..अनोळखी मुशाफरा, वळून पाहशील का…”

“सुनीता…अगं हे गाणं..इतके जुने…तुला मिळाले तरी कसे..” सुनीताची आई विचारती झाली.

“मिळाले कुठे तरी…तू ते गुणगुणायचीस हे मी लहानपणापासून ऐकत आले आहे.”.. सुनिता
“अगं हो सुनिता हे माझ्या……”

तिला मधेच तोडून सुनीता म्हणाली…

“आई, मला क्षमा कर पण मी तुझी डायरी चोरून एकदा वाचली होती….आई,…नव्हे, विमल,.. त्या वेळच्या तुझ्या डोळ्यातल्या लटकत्या अश्रू ची आठवण अजून ताजी असणारा हा बघ तुझा मंग्या…मंगेशा…”

विमल माझाकडे पहात असताना तिच्या डोळ्यातले भाव माझ्या वर्णनापलीकडे होते………

ह्यावेळी अश्रू मात्र तिच्या दोन्ही डोळ्यात होते… एका डोळ्यातला अश्रू तोच पंचेचाळीस वर्षां पूर्वीचा, त्या अश्रूत ओढ होती…आणि असहाय्यतेचे दु:ख होते.

दुस-या डोळ्यातला अश्रू आजचा ताजा होता…आनंदाश्रू? मी नाही सांगू शकत…

माझे अश्रू मी बाहेर येऊ दिले नाहीत…

मधुसूदन थत्ते
२२-०९-२०१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *